महाराष्ट्र चेंबर (MACCIA) तर्फे ‘भारतीय आहोत, भारतीयच वस्तू वापरू’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

"भारतीय आहोत, भारतीयच वापरू’”अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी.
भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हावा, यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर (MACCIA) ने एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ या राज्यव्यापी जनजागृती अभियानाची आज घोषणा करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी प्रेरित करणे.अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% कराच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले, “अमेरिकेच्या अन्यायकारक धोरणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाम व सडेतोड उत्तर दिले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र चेंबर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठीच हे अभियान राबवले जात आहे.”गांधी म्हणाले, “अमेरिका असो वा चीन परदेशी शक्तींच्या मनमानी कारभाराला उत्तर देण्यासाठी भारतीयांनी स्वदेशीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे.”या अभियानातून राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वदेशी वस्तूंचे महत्त्व पोहोचवले जाणार असून, सणासुदीच्या काळात किमान ₹5,000 कोटींचा विदेशी वस्तूंचा व्यापार कमी करून भारतीय उत्पादनांची विक्री वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील एका वर्षात महाराष्ट्रातून किमान ₹70,000 कोटींच्या भारतीय वस्तूंचा वापर वाढवण्याचा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.गांधी यांनी सर्व उद्योगधंदे, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याच्या या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला अनेक व्यापारी, उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ अभियान सुरू.